नव्या पाणी योजनेतून सिडकोच्या जलकुंभात पाणी दाखल

Foto

पाणी पुरवठ्यातील गॅप कमी होणार : वाढदिवसाचा साधला मुहूर्त; वसाहतींची तहान भागण्यास मदत
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील विविध अडचणींवर मात करत अखेर बुधवारी (दि.२२) या योजनेचे पाणी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा टप्पा गाठण्यात आला. आता ही टाकी दिवसातून तीन वेळा भरली जाणार असून, यामुळे या जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या वसाहतींमधील
पाणीपुरवठ्यातील गॅप कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
एमजेपी कंत्राटदार यांच्या वादाचा आणि परिणाम नवीन पाणीपुरवठा योजनेवर होत असून, एक विशेष बैठक घेऊन अडचणी दूर कराव्यात अशी मागणी महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेत सक्त ताकीद दिली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून एमजेपीचे सदस्य सचिव रंगा नायक यांनी २० व २१ या रोजी शहरात आले. २२ जुलै रोजी नवीन योजनेअंतर्गत टाकलेल्या १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात
आली. नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रापासून १५०० मिमी, २ हजार मिमी आणि ११०० मिमी व्यासाच्या तीन
जलवाहिन्यांद्वारे पाणी शहरात आणले जाणार आहे.
मिसारवाडीपर्यंत पोहोचणार पाणी
या योजनेअंतर्गत टाकलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून सिडको एन-५ व्या जलकुंभ-२ आणि जलकुंभ-३ मध्ये पाणी घेण्यात आले. या टाक्यांमधून सिडको हडको, चिकलठाणा, रामनगर आदी भागाला पाणी पुरवठा करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २३) मिसारवाडीपर्यंत पाणी पोहोचवण्यात येईल. १२ एमएलडी पाणी दररोज दिले जाईल, असे जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगुलोथ यांनी सांगितले.
टप्पे विस्कळीत; शहरवासीयांना त्रास
नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यास विलंब झाल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला. पाण्याचे टप्पे विस्कळीत झाले. शहराचा पाणीपुरवठा बारा ते पंधरा दिवसावर गेला, अशा परिस्थितीतही शहरवासीयांनी सहकार्य केले. त्याबद्दल जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगुलोथ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.